रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

भावबंधन अंक दुसरा (प्रवेश दुसरा)

प्रवेश दुसरा

(स्थळ : धुंडिराजाचे घर; पात्रे : धुंडिराज व घनश्याम.)
घनश्याम    :    (स्वगत) का कुणास कळे, या थेरडयाला बघताक्षणीच मला दीडाच्या आत नाटक आटपण्याची कल्पना ताबडतोब आठवते. याच्या मनमोकळेपणाला उगीच मोकळे सोडण्यात आता काही अर्थ नाही. (उघड) धुंडिराजपंत, एका फार महत्त्वाच्या बाबतीत आपणाशी मला थोडे बोलायचे आहे; आणि ते बोलणे सर्वस्वी गुप्त राहावे हे आपल्यालाच हितप्रद आहे, म्हणून मी मुद्दाम एकान्त साधून आपली भेट घेतो आहे. नीट लक्ष देऊ न मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. लक्ष आहे ना नीट? धुंडिराजपंत, माझ्या एका अधिकारी मित्राने मजजवळ एक कागद दिलेला आहे. हा पाहा तो कागद. नीट लक्ष आहे ना ? (कागद दाखवितो.)

धुंडिराज :    अरे बाप रे ! हा तर-

घनश्याम :    आपला तर्क बरोबर आहे; पण हे भेदरणे मात्र बरोबर नाही. मी सांगितले ना, की नीट लक्ष्य द्या म्हणून? मी आपणाला भयचकित करून सोडण्यासाठी आलो नाही. सध्या फार बोलायला मला वेळ नाही आणि मी आपणालाही वेळ देणार नाही. धुंडिराजपंत, हा आपला चोरीबद्दलचा कबूलजबाब, आपल्या खर्‍या स्वरूपाची रूपरेखा यात स्पष्ट रेखाटलेली आहे. मला वाटत होते तितके आपण चांगले नाही, आणि आपणाला वाटते तितका मी पण चांगला नाही. धुंडिराजपंत, आता मी काय बोलतो ते नीट, फार नीट लक्ष देऊ न एकदाच ऐकून घ्या. समजा, हा कागद मी कोणाला दाखविला, तर त्याचा काय परिणाम होईल बरे ? एका क्षणात सरकारचे लोक तुम्हाला अटक करतील. चारचौघांकडून तुमच्यावर बेरड, बदमाष, चोर यांसारख्या शेलक्या शिव्यांचा मारा होईल. तुमच्या अपराधाला योग्य अशी शिक्षा भोगण्यासाठी तुम्हाला तुरुंगात जाऊ न पडावे लागेल. तुम्ही तुरुंगात जाताक्षणीच तुम्हाला जीव की प्राण वाटणारी तुमची पोरेबाळे अन्नावाचून थयथया करतील. तुम्ही म्हणाल, की तुमच्या पश्चात् प्रभाकर तुमच्या मुलाबाळांचे योग्य संगोपन करील म्हणून; पण खाण्यापिण्याची तूर्त त्यांना अडचण न पडली तरी कैद्याची मुले म्हणून त्यांना समाजात अगदी खालच्या पायरीवर जाऊ न पडावे लागेल. जो तो तुमच्या मुलांकडे बोट करून म्हणेल, की ही कैद्याची मुले, ही म्हातारडया बेरडाची पापी पोरे, ही त्या साळसूदपणाच्या नावाखाली डाके पाडणार्‍या दरोडेखोराची कमजात कारटी ! धुंडिराज, क्षणार्धात तुमच्या भरलेल्या संसाराची अशी दुर्दशा करून टाकायचे हे साधन माझ्या अधिकारी मित्राने वाटेल तो उपयोग करण्यासाठी माझ्या हाती देऊ न ठेवले आहे.

धुंडिराज :    शिव हर ! कैलासनाथ ! कैलासनाथ !  काय रे प्रसंग आणलास हा माझ्यावर! घनश्याम, घनश्याम ! तुम्ही काही खात्रीने अशी वेळ माझ्यावर आणणार नाही.

घनश्याम :    धुंडिराज, देवाची नावे आळविण्याइतकेच या घनश्यामाच्या नावाने टाहो फोडणेही व्यर्थ आहे ! देवांच्या सबंध मूर्ती दगडाच्या केलेल्या असतात, घनश्यामाचे नुसते मनच दगडाचे आहे. घनश्याम जवळ जवळ तुमच्या निर्विकार देवाइतकाच दयाळू आहे. धुंडिराज, अगदी शांत मनाने तुमच्यावर असा प्रसंग आणायला मला कोणती हरकत आहे ? मी तीच वेळ तुमच्यावर आणणार आहे आणि तेच सांगण्यासाठी आता मी आलो आहे. मी निश्चयपूर्वक तुम्हाला सांगून ठेवतो, की मला दयामाया बिलकुल नाही, आणि मी बोलेन ते करीनच असा माझा बाणा आहे.

धुंडिराज :    नका हो नका !  घनश्याम, माझ्या पोराबाळांकडे पाहा.  नका हो असे निष्ठुर होऊ! तुमचे पाय धरतो, माझ्या गरीब बाळांना असे देशोधडी लावू नका !

घनश्याम :    हे पाहा धुंडिराज, मी सांगितले ना, की मला खरोखर दयामाया मुळीच नाही म्हणून? या आळवण्याविनविण्यांचा आणि रडण्याओरडण्याचा माझ्या मनावर काहीएक परिणाम व्हायचा नाही. माझे मन नि:श्वासांनी हलायचे नाही, आसवांनी भिजायचे नाही, किंकाळयांनी हादरायचे नाही, किंवा शिव्याशापांनी जळायचे नाही. मी सांगेन त्याप्रमाणे मुकाटयाने वागाल तरच तुमच्यावर हे संकट मी आणणार नाही, मात्र नसते वादविवाद करण्याची माझी तयारी नाही हे मी आधीच सांगून ठेवतो. माझे म्हणणे अक्षरश: पाळायला तयार आहात का ?

धुंडिराज :    तुमचे जे काय म्हणणे असेल ते मला मान्य आहे, कबूल आहे; पण माझ्यावर एवढी दया कराच हो !

घनश्याम :    पुन्हा बोलायला लागला ! धुंडिराज, आधी तुमची बडबड एकदम बंद करा! ऐका आता. तुम्ही आपली मालती धनेश्वरांना दिली पाहिजे. अजागळासारखे चेहेरे काय बदलता? धनेश्वरपंत लग्नाला तयार आहेत. तुम्ही आपली मुलगी मालती त्यांना द्यायला तयार असाल तरच तुमची अब्रू निभावेल.

धुंडिराज :    अहो, काय बोलता हो हे ? नाही, माझा प्राण गेला तरी मी माझ्या मालतीच्या जन्माची अशी माती करणार नाही. मेलो तरी-

पुढे वाचा: भावबंधन अंक दुसरा (प्रवेश दुसरा)