रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

भावबंधन अंक दुसरा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(स्थळ : धनेश्वराचे घर; पात्रे : लतिका व मालती.)

धनेश्वर :    हं, लतिके, मी म्हणतो असे हे झालेच पाहिजे. मोरेश्वराशीच तुझे लग्न करायला हवे.

लतिका :    बाबा, मी नेहमी मनात असेल ते बोलून दाखवते; पण असे बोलू नये म्हणून ही मालतीताई कालपासून सारखी बजावते आहे. एवढयासाठी मी अधिक बोलत नाही. तरी पण तुम्हाला अगदी निक्षून सांगते, की हे लग्न मला नको आहे.

धनेश्वर :    लतिके, तुला विचार नाही, दूरदृष्टि नाही, व्यवहारज्ञान नाही म्हणून तू अशी बडबडत सुटली आहेस. माझ्यासारख्या व्यवहारपंडिताची तू मुलगी. आणि तुला हे एवढे कळत नाही कु णास कळे !

लतिका :    बाबा, काय सांगू मी तुम्हाला ! आईबापाच्या गुणांवर जायचे भाग्य सगळयाच मुलांच्या कपाळी थोडेच असते ! गुण सर्वत्र वंशपरंपरागतच असतात का ?
(राग - तिलंग, ताल - त्रिवट.)
कुलगुण सकलां न सर्वदा ॥
विधिसुघटित परि जगतिं गुणमान ॥ध्रु.॥
विमल पंकजा, पंक मलिन जरि
स्थिर, गिरितट तटिनी न स्थिरचितरि ।

जन्यजनक नच गुणिं समसमान ॥1॥

धनेश्वर :    लतिके, शिक्षणामुळे वायफळ बोलायला मात्र शिकलीस ! या चटोर चोपडयांनी तुझे डोके अगदी फिरून गेले आहे; त्यामुळे तुला डोळयांसमोरच्या गोष्टी दिसत नाहीत. माझ्या डोक्यात या लग्नाची कल्पना येईपर्यंत, तुझ्या कपाळी किती सुख आहे याची मलाही कल्पना नव्हती ना ! हे पाहा, लतिके, चार अक्षरे वाचता आली म्हणजे ललाटीचा लेख वाचता येतोच, असे मात्र नाही.

लतिका :    बाबा, ललाटीचा लेख वाचता आला नाही, तरी आम्हा मुलींना कपाळींचे कुंकू नीट रेखून लावायचे लहानपणापासून कळत असते.

धनेश्वर :    हं, शिक्षणामुळे हे फटकळासारखे बोलायला मात्र येते ! चार अक्षरे हस्तगत झाली, की हा परिणाम ठेवलेला! हे शिक्षण फार फार वाईट आहे.

लतिका :    बाबा, हा ज्याचा त्याचा हातगुण असतो. यात बिचार्‍या शिक्षणाचा काय दोष ? चार अक्षरे वाचता आली म्हणजे चांगलेही बोलता  येते आणि वाईटही बोलता येते. चार अक्षरे लिहिता आली म्हणजे त्रिकालाबाधित सुंदर सत्येही लिहिता येतात, आणि पांढर्‍यावर काळे करून खोटे दस्तऐवजही लिहिता येतात.

धनेश्वर :    हा रिकामा वादंग नकोच आहे मुळी ! यानेच तर बोलण्याची मर्यादा सुटत जाते! मुलींनी असे उर्मटपणाने बोलायला सुरुवात केली म्हणजे बापाच्या संसाराचा शेवट झालाच म्हणून समजावे !

लतिका :    आणि बोलायला सुरुवात केली नाही तर मुलींच्या संसाराचा शेवट व्हायचा !

धनेश्वर    :    लतिके, तुला एकवीस वर्षे काही उलटली नसतील. सामान्य मनुष्यांतसुध्दा सरकारने अज्ञानाच्या वयाची मर्यादा संस्थानिकाप्रमाणे एकवीस वर्षांचीच ठेवायला हवी होती ! मांजरीच्या पिलांचे डोळे दहाव्या दिवशी आणि कुत्रीच्या पिलांचे डोळे एकविसाव्या दिवशी उघडतात; पण माणसाच्या पोरांचे डोळे मात्र एकविसाव्या वर्षांपर्यंत उघडत नाहीत !

लतिका :    इतकेच काय, पण कधी कधी डोळे कायमचे मिटायची वेळ आली तरी उघडत नाहीत ! त्यामुळे आपल्या पायाखाली काय जळते हे सुध्दा माणसाला दिसत नाही.

धनेश्वर :    तुझे बोलणे ऐकले म्हणजे अशी तळपायाची आग मस्तकाला जाऊ न पोचते.

लतिका :    म्हणूनच शेवटी माथ्यात राख घालायची अशी वेळ येते ती !

धनेश्वर :    बस !  अगदी अखेर झाली - कारटीला डोक्यावर बसविली त्याचा हा परिणाम!

मालती :    लतिकाताई, काय हे बोलणे बरे ? विनयाची मर्यादा सोडून बोलणे केव्हाही हितप्रद नसते. तोंडाळपणामुळे कुणाचे कधी बरे झाले आहे का? वडिलांना कुठल्याही प्रसंगी असे बोलू नये.

धनेश्वर :    ऐक तिचा उपदेश. मालती, मुलीने बापाला काय बोलावे हे सांग तिला एकदा नीट.

लतिका :    बाबा, मालती कधी धुंडिराजकाकांना उलट बोलत नाही, आणि मी सुध्दा त्यांना कधी बोलत नाही.

मालती :    ताई, खरे विचारशील तर तुझ्या बोलण्याचा मलासुध्दा राग आला होता. बोलताना कधीच विचार करायचा नाही म्हणजे काय ? जनरीत काही आहे की नाही ?

धनेश्वर :    शाबास, मालती, तू मोठी गुणांची मुलगी आहेस. मुलगी कसची तू! चांगली पोक्तीपुरवती बायकोच म्हणावे लागेल तुला. केवढी प्रौढ बुध्दी आहे तुझी! एखाद्याचा विस्कटलेला संसारसुध्दा सुरळीतपणे सांभाळण्याची अक्कल आहे तुझ्या अंगात! लहानपणापसूनच तू अशी विचारी आहेस. आमच्या या लतिकेप्रमाणे एखादी लहानशी अजाण मुलगी या दृष्टीने तुझ्याकडे पाहावेसे मला कधीच वाटले नाही.

लतिका :    बाबा, साठी उलटली का हो तुमच्या वयाला ?

धनेश्वर    :    माझे आई, तुझ्याशी बोलण्याची तुझ्या बापाची तर काय, पण माझ्याही बापाची छाती नाही ! पुरे झाले हे बोलणे. मला एवढे ठाऊ क आहे, की तुझे त्या मोरेश्वराशी लग्न लावून टाकायचे. (स्वगत) पातकी माणसाची पोरेबाळेसुध्दा त्याचा कसा अनादर करितात याचे मूर्तिमंत चित्र आहे आमचे घर म्हणजे !  दिवसाढवळया घरात अगदी नाटक चालले आहे जसे काही !
(कानडी वेषात प्रभाकर वृध्दरूपाने प्रवेश करितो. इंदु व बिंदुहि प्रवेश करितात.)

इंदु :    काका, हे कोणसे तुम्हाला भेटायला आले आहेत. कुणी म्हातारे आहेत वाटते.

धनेश्वर :    इंदु, यांची टीचभर पांढरी दाढी पाहूनसुध्दा तुला हे म्हातारे आहेत असे नुसते वाटतेच आहे ना ? हे म्हातारे नाहीत, मग काय म्हातार्‍याचे सोंग घेऊ न आले आहेत वाटते ? या, बसा मिस्टर !

प्रभाकर :    (स्वगत) हे कानडी सोंग आणले आहे खरे मी; पण नुसत्या दाढीमिशांनी म्हातारपण सजविण्यात पोरकटपणा तर नाही ना होत हा ? बाकी, साेंग उघडकीस आले तर, फार झाले तर थोडासा हशा होईल एवढेच. आमच्या दोन घरांचा आज इतके वर्षांचा ऋणानुबंध लक्षात घेतला म्हणजे या सोंगाकडे इतके लक्ष देण्याचे कारणच नाही. एका घरातल्या घरात मुले एकमेकांना फसविण्यासाठी सोंगे घेतात त्यापेक्षा या गोष्टीचा फारसा बागुलबुवा वाटण्याचे काय प्रयोजन आहे? तसे म्हटले तर लतिकेला यांच्यादेखत भेटण्याची चोरी आहे थोडीच !

धनेश्वर :    हं, कोण, काय, कुठले तुम्ही ? काय काम आहे ?

प्रभाकर :    आपण धनेश्वरमहाराज ? ठीक ! (पत्र देऊ न) हे पत्र एक लोक देतो.

धनेश्वर :    (पत्र वाचून) कानडी  पंडित आहा आपण? अस्से! आमच्या लतिकेला शिकविण्यासाठी ठेवावे म्हणता ? का हो, तुम्हाला कुणी सांगितले, की आम्हाला कानडी इसम हवा आहे म्हणून ?

प्रभाकर    :    एक मोरेश्वर गृहस्थ, आगगाडीचे डबीत भेटलो. सर्व बोलतो हे हकीकत. आम्ही कळलो तर पत्र घेतला- आले.
धनेश्वर :    मराठी येते का ?

प्रभाकर :    थोडे; लोक बोलतो तो समजतो. हिंदुस्थानी थोडे. जन्मतो कन्नड, पुढे काशीगुरु शास्त्र शिकवलो. षट्शास्त्र, वेदवेदान्त वाचलो. फार पारंगत ! केवळ मुखोद्गत!

धनेश्वर :    लतिके, यांना संस्कृतात नाव विचार पाहू ?

लतिका :    पुराणपुरुष, एते मे तातचरणा भवतो नामधेयं ज्ञातुमिच्छन्ति.

प्रभाकर :    (स्वगत) नाव काय सांगू आता ? कानडी नाव- (उघड) गिरसाप्पा. महामहोपाध्याय गिरसाप्पा. भवति,

अपूर्व: कोऽयमस्माकमुत्साह:, यद् भवत्या सम्यक् प्रतिपन्नमादृग् गीर्वाणभाषाप्रावीण्यम् ।

लतिका :    नहि नहि, महाशय, अत्यल्पमेव तत् ।  तदपि - काय गं मालतीताई, प्रॅक्टिस नाही म्हणजे काय ? हो- अनभयसनात् तदपि विस्मृताप्रायम्. सुटले बाई एकदाची, संस्कृत नाटकातून बायकांना प्राकृत भाषा का बोलायला लावली आहे हे मला आज कळले.

धनेश्वर :    छान आहे. गिरसाप्पा, काही इंग्रजीबिंग्रजी ?

प्रभाकर :    नॉट मच; लिटल्.  प्रॅक्टिस नास्ति.

धनेश्वर :    ठीक आहे बरे गिरसाप्पा, तरुणांच्या दृष्टीने अत्यंत नीरस, रुक्ष, खूप मोठा, फार अवघड असा संस्कृत शास्त्रग्रंथ कोणता आहे ?

प्रभाकर :    योगवासिष्ठ बृहद् योगवासिष्ठ !  बहोतही बडा ग्रंथ ! षष्टिलक्ष ग्रंथ, नीरस व्हेरी मच. एक पंडित काशीघाट पारायण केलो, तर ती तरुण लोक गंगेत जीव दिले, दोन लोक जागेवर मेलो. कंटाळला.

धनेश्वर :    आले, आले लक्षात ! हे बघा, गिरसाप्पा, ही आमची मुलगी लतिका. शिक्षणाच्या ललित वाङ्मयामुळे हिची प्रकृती थोडीशी बिघडली आहे. तेव्हा हिची प्रकृती ताळयावर आणण्यासाठी तुमच्या योगवासिष्ठांची सात पारायणे तिला पाजा. योगवासिष्ठाच्या औषधाचे हिंदुस्थानी राकटपणातून इंग्रजी जोडाक्षरातून आणि संस्कृत अनुस्वारातून कोळून एक सातरे दिले म्हणजे झाले. मधूनमधून न शिजण्याजोगे तुमचे कानडी खडे चारले तर उत्तमच आहे. एकेक इलाज करून पाहायचा.
(घनश्याम महेश्वराला घेऊ न येतो; महेश्वराजवळ तंबोरा.)

पुढे वाचा: भावबंधन अंक दुसरा (प्रवेश पहिला)