रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

पुण्यप्रभाव अंक पाचवा (प्रवेश पहिला)

प्रवेश पहिला

(सुदाम व नूपुर प्रवेश करतात.)
सुदाम : स्नेहधर्माला जागून तुम्ही चांगलीच चूक माझ्या पदरात घातली म्हणायची! दामिनी रात्रभर बाहेर होती म्हणता?

नूपुर : सगळी रात्रभर! इतकंच नाही पण कंकणाचेही अंग आहे या कारस्थानात! माझी तर खात्री झालेली आहे, की कंकणाची तुमच्या घराकडे सोज्वळ दृष्टि काही नाही! तसाच तो गोसावी! अगदी खटपटीत असल्यासारखा दिसतो! मग गुलामाचे काय खलबत आहे नकळे! तुम्हाला ही येणीजाणी नीट कळत नाहीत. अहो, एरवी कंकण तुमच्या घरी वरच्यावर कशाला येत बसेल? हं बघा, नवर्‍याशी दोस्ती करणारांपैकी पुष्कळांची नजर निराळीकडेच लागलेली असते!

सुदाम
: दामिनी रात्रभर बाहेर राहिली असेल तर मोठा अनर्थापातच म्हणायचा! आता जातो आणि बारकाईने चौकशी करितो! (स्वगत) हा म्हणतो हे खरे असेल तर आताच्या आता काही तरी युक्ति योजून दामिनी जगावेगळी केली पाहिजे. नाहीतर बिघडलेल्या बायकोच्या नवर्‍याइतका दुर्दैवी प्राणी जगात नसतो असे म्हणतात त्याचा मलाच अनुभव यायचा कदाचित्! (जातो.)

नूपुर : (स्वगत) आता किंकिणीला जाऊ न सांगावे, की कंकण दामिनीच्या नादी लागला आहे आणि कंकणालाही देतो सांगून, की किंकिणीचे सुदामाशी सूत आहे म्हणून! आणि हे सुध्दा काही अगदीच खोटे नाही! काल किंकिणी जी सुदामाच्या घरी आली ती काही दामिनीला भेटण्याला नव्हे! एवढया कारणावरून त्या दोघांचे जमलेले लग्न पुन्हा मोडून काढिता येईल अजून! हो, असेच करावे झाले. (जातो.)