गोफ
(घटनेपेक्षां विघटना सुकर असते, हा व्यवहारी जगाचा सिध्दान्त आहे.
हृदयाच्या ब्रह्मांडांतहि ज्यांना हेंच सत्य पटलें आहे, तें भाग्यशाली ! )
पदर आणिले तुझे कांहिं तूं, माझे आणि मीहि तसा ॥
हांसत खेळत गोफ गुंफिला, कळलें नाही कवीं कसा ॥1॥
एकामेकांभंवती फिरतां, गिरकी जीवांना आली ॥
चढत चालला खेल जसा तो, नजरहि धुंद तशा झाली ॥2॥
कुणीं निंदिले, कुणी वंदिले, कुणि हंसले, रडलेंहि कुणी ॥
नाहि पाहिलें आम्ही तिकडे, विश्व बुडालें प्रेमगुणी ॥3॥
परि दैवाचा खेळ निराळा - खेळ नकोसा तुज झाला ॥
ज्या खेळानें जीव रंगला, त्याचा कंटाळा आला ॥4॥
गोफ गुंफिला उलगडण्याचा कठिण काळ येउनि थडके ॥
हाय, वदावें काय ? जिवलगे, ऊर तेवढा हा धडके ॥5॥
हळूहळू ओढणें हळु जरा ओढायाची कां घाई ? ॥
भलता धागा ओढितांच तूं, जीव जिवलगे, हा जाई ॥ 6॥
थांब, उलगडूं गोफ कठिण हा शांत बुध्दिनें सखे असा ॥
कीं न तुटावा पदर एकही, धागा धागा नीट तसा ॥7॥
ना तरि होईल हानि आपुली आणि जगाचें हंसें तसें ॥
एक्या ठायीं आलों कां वद दूर व्हावया सखे असें? ॥8॥
कठिण असे, तरि उलगडणें हा गोफ असे आतां भाग ॥
ना तरि त्याचा पीळ राहुनी छळील तो जागोजाग ॥9 ॥
मनापासुनी जें केलें, जें मान्य जीवांनाही झाले ॥
विमनस्कपणें परी आज तें निस्तरणें नशिबीं आलें ॥10॥
कठिण जोडणें, परी तोडणें सुकर वाटतें जनांप्रती ॥
उलटा अनुभव आला आम्हां. गुंग जाहली इथें मति ॥ 11॥
अनुष्टुभ्
खेळतां गुंफिला गोफ, जीव त्यालागिं वाहिला ॥
'गोविंदाग्रज' सांगेना कीं त्याचा पीळ राहिला ॥