चिन्तातूर जन्तु
''निजलें जग; कां आतां इतक्या तारा खिळल्या गगनाला ।
काय म्हणावें त्या देवाला ? --'' '' वर जाउनि म्हण जा त्याला.'' ॥1॥
'' तेज रवीचें फुकट सांडते उजाड माळावर उघडया ।
उधळणूक ती बघवत नाही --'' ''डोळे फोडुनि घेच गडया'' ॥2॥
''हिरवी पानें उगाच केली झाडांवर इतकीं कां ही ।
मातिंत त्यांचे काय होतसें? --'' '' मातिस मिळुनी जा पाही !'' ॥3॥
''पुराबरोबर फुकटावारी पाणी हें वाहुनि जात ।
काय करावें जीव तळमळे --'' '' उडी टाक त्या पूरांत'' ॥4॥
''ही जीवांची इतकी गरदी जगांत आहे का रास्त ।
भरत मूर्खांचीच होत ना ?'' ''एक तूंच होसी जास्त'' ॥ 5॥
देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी ।
या चिन्तातुर जन्तूंना एकदां मुक्ति द्या परी ॥ 6॥
-9.11.1917, पुणे.