रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

अल्लड प्रेमास

क्षणभर वेडया प्रेमा थांब !
अधिर मनासह जासी कोठे ?
चुकशिल--संकटि पडशिल वाटे,
जग हे सारे बा रे खोटे !
हृदय सोडुनि; गडया म्हणूनी, जाई न कोठे लांब !
क्षणी पांढरा,क्षणीच काळा,
रंग आवडे असा जगाला,
ठाव तयाचा कुणा न कळला !
खुळया तुलाची, अशा जगाची, कळेल का कृति सांग?
जग सगळें हे देखाव्याचें !
गुलाम केवळ रे स्वार्थाचें !
स्मशान की हे शुध्दत्वाचें !
शुध्द भाबडे, सरळ रोकडे, अशांत करिशिल काय?
प्रेमा येथे शपथ लागते !
प्रासावाचुनि कविता अडते !
कर्त्यावांचुनि कार्यही घडतें !
देव बिचारा, तया न थारा तुझी कथा मग काय?
तुझ्यासारखा तुला सोबती---
मिळेल का या अफाट जगतीं?
-- संकुचितहि हें अफाट जरि अति--
आणि न मना, अशी कल्पना, अगदी भोळा सांब !
कोणी तुजला मानिल खोटे,
तिरस्कारहि दिसेल कोठें,
अपमानाचेही भय मोठें,
बाग जगाची, ही न फुलाची, काटे जागोजाग !
टाकिल कुणि तुज धिक्काराने,
रडविल किंवा उपहासानें,
फसविल नकली की मालाने,
कोणी भटकत, उगाच रखडत,फिरविल मागोमाग !
म्हणुनि लाडक्या ! कुठे न जाई,
या हृदयांतचि लपुनी राही,
योग्य मित्र नच सुख तरि नाही !
कुसंगतीहुनि, वेडया ! मानीं, फार बरा एकान्त !
१९०९