रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

नाट्यकलेची उत्पत्ती

(नाटकाच्या उत्पत्तीविषयी दोन तर्क)

नाटयकलेला ज्यांनी आपले नावही अर्पण केले आहे त्या भरतमुनींनी एका अनध्यायाचे वेळी आपल्या शिष्यसंघास नाटयोत्पत्तीचा इतिहास येणेप्रमाणे सांगितला आहे की, एके समयी इंद्रादी देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणू लागले, ''हे भगवन्, आम्हाला असे एक करमणुकीचे साधन द्या की, जे दृश्य व श्राव्य असून ज्याचा लाभ शूद्रादिकासही घेता यावा.'' त्यावरून ब्रह्मदेवाने ऋग्वेदापासून गद्य, सामवेदापासून गीत, यजुर्वेदापासून अभिनय व अथर्वणापासून रस घेऊन सार्ववर्णिक असा हा पाचवा नाटयवेद निर्माण केला. हा नाटयोत्पत्तीचा पौराणिक इतिहास झाला. यावरच पूर्ण विश्वास ठेवून स्वस्थ बसणे हल्लीच्या शोधक काळाला अनुसरून होणार नाही. जुन्या करारात सांगितलेल्या सृष्टीच्या उत्पत्तीबद्दलच्या पवित्र कथेवर विश्वास न ठेवता डार्विनसाहेब मनुष्याच्या उत्पत्तीचा शोध करू लागले. त्यांचेच अल्प अनुकरण करून नाटयशास्त्रांतर्गत या नाटयकलेच्या इतिहासाविषयी थोडासा अविश्वास दर्शविला तर तो क्षम्य होणार आहे.

नाटक हे काव्याचे एक अंग मानले आहे आणि ते तसे आहेही. गद्य व पद्य यांच्या संयुक्त स्वरूपापासून नाटकाची उत्पत्ती आहे. नाटक हे काव्याचे उत्तरस्वरूप आहे; किंवा काव्य हे नाटकाचे आद्यस्वरूप आहे असेही म्हणता येईल. तेव्हा नाटयकलेच्या इतिहासाचा विचार करण्यापूर्वी काव्याची उत्पत्ती कशी झाली असावी याचाच विचार करावयास हवा.

मनुष्याला दोन मार्गांनी आपले विचार प्रकट करिता येतात. एक गद्यात किंवा एक पद्यात. या दोन रीतींपैकी गद्य हे पद्याच्या आधी जन्म पावले असावे असे कोणाही मनुष्यास साहजिकपणेच वाटते व ते नि:संशय खरेही आहे. प्रथम मनुष्य आपले विचार व विकार गद्यातच प्रकट करू लागला असला पाहिजे. स्वाभाविकपणे बाहेर येणार्‍या व स्वैर म्हणावयाच्या गद्याऐवजी बर्‍याचशा अस्वाभाविक रचनेच्या व काही विवक्षित आणि नियमबध्द रीतीने म्हणावयाच्या पद्याच्या रूपाने मनुष्य आपले विचार प्रथम प्रकट करू लागला असेल हे अगदी असंभवनीय आहे. मनुष्यप्राणी आणि व्यावहारिक भाषेतील गद्यभाग या दोहोंची उत्पत्ती अगदी एकाच वेळी झाली असली पाहिजे. पुढे भोवताली पसरलेल्या सृष्टीतील विविध पदार्थांविषयीचे ज्ञान जसजसे वाढत गेले तसतशी भाषेचीही उत्तरोत्तर वाढ होत गेली. माहीत झालेले पदार्थ व त्यांचे उपयोग परस्परास कळविण्यासाठी मनुष्यांना आपली विचार प्रकट करण्याची शक्ती- अर्थात भाषा- वाढवावी लागली. किंबहुना मानवी प्रयत्नाने मुद्दाम केलेल्या साहाय्यावाचून आपोआपच भाषेची वाढ होत गेली. या सुमारास मनुष्याला जीवनसाधनाविषयी पुष्कळसे ज्ञान होऊन त्याचा आयुष्यक्रम बराचसा व्यवस्थित झाला होता. सृष्टीच्या नवीनतेबद्दल त्याला आश्चर्य वाटेनासे होऊन तो तिच्या घटकांच्या उपयुक्ततेबद्दल विचार करू लागला होता. सृष्टीतील नियमाने घडणार्‍या गोष्टीचे चांगले ज्ञान झाले होते व त्याविषयी त्याने निश्चयात्मक मते बनविली होती. उपभोग्य पदार्थांच्या बहुविधतेमुळे त्याचे सुख बरेच वाढले होते. जीवनसाधने बरीच सुलभ होऊन त्याला पुष्कळ वेळ रिकामा सापडू लागला होता. आणि या वेळाचा उपयोग सृष्टीतील अनियमित रितीने घडणार्‍या गोष्टींविषयी म्हणजे सृष्टचमत्काराविषयी विचार करण्यात तो करू लागला. मनुष्याच्या या स्थितीचा काळ हाच काव्याचा जन्मकाळ होय. समीपस्थ प्रत्यक्ष आणि ज्ञात अशा गोष्टींविषयी शोध करून तृप्त झालेली मनुष्याची जिज्ञासा या वेळी दूरस्थ, अप्रत्यक्ष आणि अज्ञात गोष्टींकडे वळू लागली होती. ग्रहनक्षत्रांचे नियमित काळी होणारे उदय, नियमितकालीन पर्जन्यवृष्टी, बीजापासून वृक्षोत्पत्ती, समुद्राची भरती-ओहोटी, भव्य खगोल, काही तरी प्रमाणात वाहणारे वारे वगैरे प्रकाराबद्दल त्याला आता आश्चर्य वाटेनासे झाले होते व जिज्ञासाप्रेरित होऊन तो त्यांची कारणे शोधावयाच्या प्रयत्नास लागला होता. सृष्टिरूप कार्यापेक्षा त्याच्या कर्त्याकडे त्याचे लक्ष वेधले होते. या सर्व उपयुक्त वस्तूचा कोणी तरी एक अदृश्य कर्ता असून तो आपले संरक्षण व पालनपोषण करितो असे त्याला वाटू लागले होते. त्या कर्ताचे आपणावर होत असलेले उपकार त्याला मान्य होत चालले असून, त्याच्या अफाट शक्तीविषयी व इतर अलौकिक गुणाविषयी विचार, कल्पना व उत्प्रेक्षा तो करू लागला होता. हे त्याचे विचार त्याच्या रोजच्या विचारांपेक्षा भिन्न प्रकारचे होते; व निराळया विकाराने युक्त होते. व्यावहारिक विचारांतील साधेपणा त्यात नव्हता. सृष्टीकर्त्याच्या शक्तीविषयी विचार करताना मनुष्याच्या मनात आश्चर्य, गांभीर्य, सभय कृतज्ञता, आदरभाव वगैरे विकार प्रादुर्भूत होऊ लागले. इंद्रधनुष्याचे मनोहर रंग, ताऱ्यांची सुंदरता याबद्दल त्याला कौतुक वाटू लागले. मेघगर्जना, विद्युत्प्रकाश, पर्जन्यवृष्टी, सागरचमत्कार यांना पाहूनही त्याच्या मनात भीती व आश्चर्यही उत्पन्न होऊ लागले. हे सृष्टचमत्कार सृष्टीकर्त्याच्या स्वरूपाचे घटक आहेत, त्याचीच भिन्न भिन्न स्वरूपे आहेत किंवा निरनिराळया शक्तींच्या स्वतंत्र विभूती आहेत असे त्यास वाटू लागले. त्यांनी केलेल्या उपकृतीबद्दल (उपयुक्ततारूप) तो वारंवार कृतज्ञतापर विचार करू लागला, वारंवार कृतज्ञतापूर्वक त्यांची सप्रेम व सादर वर्णने करू लागला. या काळचे त्याचे विचार त्याच्या व्यावसायिक विचाराहून अगदी भिन्न होते, इतकेच नव्हे, तर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ प्रतीचेही होते. हे विचार मनात येत त्या वेळी त्याची स्थिती जरा निराळयाच तऱ्हेची होई. या विचारांत पावित्र्य व पूज्यभाव वसू लागले, व त्या भरात तल्लीन होऊन तो हळूहळू हे विचार प्रकट करू लागला. नेहमीच्या विचारांपेक्षा हे विचार निराळेच असल्यामुळे त्यांचा उच्चारही तो निराळयाच रीतीने- अर्थात गद्यतर रीतीने- करू लागला. त्यात तो निरनिराळे सूर काढू लागला किंवा त्याच्या तल्लीनतेमुळेच नकळत (unconsciously) तो हे विचार निरनिराळया सुरांत आळवून म्हणू लागला. याप्रमाणे या श्रेष्ठतर प्रकारच्या व अव्यावहारिक विचारांचे काही विवक्षित रीतीने म्हणावयाचे असे जे शाब्दिक मूर्त स्वरूप तेच काव्य होय. हल्लीच्या कवितेचे हे अगदी मूलस्वरूप (crude form) होय.

पुढे वाचा: नाट्यकलेची उत्पत्ती