रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

नाटक कसे पहावे

पूर्वार्ध

काही वर्षांपूर्वी 'केसरी' पत्रात एका पुस्तकाबद्दल विनोदात्मक, परंतु मनन करण्यासारखा अभिप्राय आला होता. त्या पुस्तकाचे नाव 'जेवावे कसे' हे होते. केसरीकारांनी त्या पुस्तकाच्या बरेवाईटपणाकडे फारसे लक्ष न देता त्याच्या अकालदर्शनाबद्दल मात्र अभिप्राय दिला होता. सध्या लोकांपुढे 'जेवावे कसे' हा प्रश्न नसून 'जेवावयाचे मिळवावे कसे' हा आहे. अशा आधाराने केसरीकारांनी त्या पुस्तकाच्या अप्रयोजकतेचा उल्लेख केला होता. कधी कधी अनुभवी मनुष्याकडून वरील लेखकाप्रमाणे मौजेच्या चुका घडून येतात. 'रंगभूमी'च्या संपादकांनी 'ग्रंथसार' या नात्याने हीच चूक केली आहे. 'नाटक कसे पाहावे?' या प्रश्नाचा ऊहापोह करण्यासाठी त्यांनी सबंध एक पुस्तक लिहिण्याचे श्रम घेतले आहेत; पण दिलगिरीची गोष्ट आहे की, त्यांनी या प्रश्नाची केवळ उत्तरार्धाचीच बाजू घेतली आहे आणि मूळ महत्त्वाची बाजू तशीच ठेविली आहे. नाटकगृहात शिरल्यानंतर या प्रश्नाची बाजू प्रेक्षकांसमोर येते ती इतकी सोपी असते की, एखादा पाच वर्षांचा पोरसुध्दा तिचा उलगडा करील. 'डोळे उघडे ठेवून' हेच या प्रकारच्या प्रश्नाचे सोपे आणि सरळ उत्तर आहे; परंतु नाटकगृहात प्रवेश होण्यापूर्वी, नाटक पाहण्याच्या इच्छेला दाबून टाकणारा हा प्रश्न जेव्हा भावी प्रेक्षकांच्या पुढे उभा राहतो तेव्हा मात्र याचे उत्तर फार बिकट वाटते. ते उत्तर शोधून काढण्याचा सडेतोड मार्ग म्हटला म्हणजे रा. मुजुमदारांचे सहा आण्यांचे पुस्तक घेणे हा नसून चारसहा आण्यांचे नाटकाचे तिकिट घेणे हा असतो; परंतु शाळेत गणिताचे उत्तर जसे दोन रीतींनी शोधून काढता येते त्याचप्रमाणे प्रस्तुत प्रश्नाचे उत्तरही दोन रीतींनी शोधून काढिता येते. गणिताचा पहिला प्रकार जसा स्वत:ची अक्कल खर्चून उत्तर शोधून काढणे, तसा या प्रश्नाचा पहिला प्रकार स्वत:चे पैसे खर्चून उत्तर शोधून काढणे; परंतु दुसरा व्यवहारज्ञानाचा प्रकार शेजारच्या पाटीवर नजर फेकून काम साधणे, आणि नाटकी गणिताच्या उत्तराचा दुसरा प्रकार शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या वशिल्याने काम साधणे हा होय. या रीतीने नाटक पाहण्याचे अनेक मार्ग आहेत. ते सर्वच येथे नमूद करण्याचा विडा मी उचलीत नाही. नाटकाच्या धंद्यात पडल्यामुळे जे अगदी ठळक रीतीने माझ्या निदर्शनास आले आणि ज्यांच्या सफलतेबद्दल माझी खात्री झालेली आहे ते शेलके मार्गच माझ्या वाचकांच्या फायद्यासाठी सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. याखेरीज अन्य मार्ग शोधून काढण्याचा माझ्या वाचकांनी प्रयत्न केल्यास माझी आडकाठी नाही. रा. मुजुमदारांनी हाती घेतलेल्या प्रश्नाचा प्राथमिक विचार मी करीत असल्यामुळेच मी माझ्या निबंधाच्या मथळयाला 'पूर्वार्ध' ही संज्ञा दिली आहे. एखाद्या पुस्तकाचा उत्तरार्ध आधी निघून नंतर पूर्वार्ध निघाल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे, हेही वाचकांना त्यातल्या त्यात लक्षात ठेवण्यासारखे आहे.

पैसे खर्चून नाटक पाहावयाचे नाही आणि नाटक पाहिल्यावाचून तर राहावयाचे नाही असा दुहेरी निश्चय केल्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याचे सुमारास आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करून घराला रामराम ठोकावा. ही इष्टदेवता अर्थात् नाटक दाखविण्याजोग्या व्यक्तीखेरीज दुसरी कोण असणार? घरातून निघते वेळी खिशांतून पैशाचे पाकीट- अर्थात असेल तरच- काढून ठेवावयास कधीही विसरू नये. कारण नाटक पाहण्याची हौस काही अंशी समुद्राच्या भरतीप्रमाणे असते. साडेनऊ वाजेपर्यंत ती एकसारखी वाढत असते आणि अगदी साडेनऊ वाजता तर तिची 'समा' होते! सर्व प्रकारच्या प्रयत्नांची पिछेहाट झाली तरी या वेळी नाटकगृहाच्या दरवाजापासून दूर व्हावेसे वाटत नाही! आपल्या आणीबाणीच्या प्रसंगी काहीतरी दैवी चमत्काराने आपल्याला नाटक पाहायला मिळणार अशी निराश आशा या वेळी मनात उत्पन्न होते. पुराणातल्या द्रौपदीवस्त्रहरणासारख्या अद्भूत कथांवर आपला विश्वास नसूनही तशाच एखाद्या प्रसंगाची आपण आतुरतेने अपेक्षा करीत असतो! येणाराजाणारांपैकी प्रत्येकाकडे आपण ओळख पटविण्याच्या तीव्र दृष्टीने न्याहाळीत असतो! नाटकाच्या 'मॅनेजर'ने सहज आपल्यावर दृष्टी टाकली तरी तो आपल्याला बोलावण्याकरिताच पाहतो आहे असा आपल्या वेडया मनाला भास होतो. आपण उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागतो आणि तोंडावर कृतज्ञतादर्शक हसण्याची पेरणी करतो! इतकेच नाही, परंतु शकुंतलालोलुप दुष्यन्ताप्रमाणे बसल्या जागीच आपल्याला त्याच्याजवळ गेल्यासारखे वाटते! अशा या आशेच्या हेलकाव्यात अगदी साडे नावाचा सुमार होतो! तिकडे नाटकाची पहिली घंटा होते; इकडे आपल्या हृदयात उत्कंठतेचा दणदणाट सुरू होतो! तिकडे सूत्रधार पडद्याबाहेर येतो; इकडे आपला प्राण शरीराबाहेर येऊ पाहतो! सारांश, ही वेळ मोठया आणीबाणीची  असते! आणखी अशा वेळेस अखेर निराशेने बेफाम होऊन आपण साहजिक पैसे खर्चून नाटक पाहण्याच्या मार्गास लागतो! पण मुळीच पैसे बरोबर न घेण्याची आधीपासूनच सावधगिरी ठेविली म्हणजे या अत्याचारामुळे आपल्या हातून प्रतिज्ञाभंगाचे पातक घडत नाही आणि फुकट नाटक पाहण्याच्या इच्छेप्रमाणे पैसे खर्चून नाटक पाहण्याची इच्छाही त्याच कारणामुळे दबली जाते! एवढयासाठी अशा रीतीने नाटक पाहावयास निघताना नेमाने पैसे घरीच ठेवावेत; त्याप्रमाणेच पैशाबरोबरच लाजलज्जा, भीडमर्यादा, अंत:करण, वाईट वाटण्याची मनाची शक्ती वगैरे सर्व भानगडीसुध्दा घरीच ठेवाव्या; कारण 'दरवाज्या'वरील धक्काबुक्कीत आपल्या नाजूक मालमत्तेचा सांभाळ करणे जड जाते! त्यांच्याऐवजी निर्लज्जपणा, कोडगेपणा यांसारख्या ढाली घेतलेल्या असल्या म्हणजे नाटकगृहाच्या पहारेकऱ्याने शब्दशास्त्रांचा कसलाही मारा केला तरी त्यातून निभावून जाता येते! असो!

पुढे वाचा: नाटक कसे पहावे