रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

नाटक कसे लिहावे

नाटकाच्या धंद्यात मोरावळयाप्रमाणे मुरलेल्या माझ्या एका सन्मान्य मित्राने मराठी नाटयविदृक्षु लोकांस 'नाटक कसे पाहावे?' हे सांगण्याचा यत्न केला आहे. हेच गृहस्थ भावी मराठी लेखकांना 'नाटक कसे लिहावे?' याविषयी काही धडे देणार आहेत असे माझ्या कानावर आले आहे. त्यावरून सदरहू विषयासंबंधीचे माझे विचार मी सध्या प्रसिध्द करीत आहे. वर सांगितलेल्या गृहस्थास किंवा या विषयावर लिहू इच्छिणार्या दुसर्या कोणासही माझ्या या विचारांचा मनमुराद फायदा  घेता यावा म्हणून मी मुद्दाम या विचारांचे ''1837 च्या 25 व्या आक्टान्वये सर्व हक्क राखून ठेविले नाहीत!'' नाटक लिहू इच्छिणार्या भावी तरुणास तर हा लेख फारच उपयोगी आहे. यातील सूचनांच्या योग्य विचाराने जे नाटक लिहिले जाईल ते सध्याच्या नाटकग्रंथांच्या मालिकेत बसावयास पात्र झाल्याखेरीज राहणार नाही.


नाटक लिहावयाचा विचार कायम ठरल्यानंतर सहा महिनेपर्यंत रोज या विचाराच्या निश्चयाबद्दल निजावयाचे पूर्वी तीन तास विचार करावा. कोणतीही गोष्ट पूर्ण विचारांती करावी असे वृध्दाचे म्हणणे आहे. अशा प्रकारे वागत गेल्याने केवळ नाटक लिहिण्याचा आपला हेतू पूर्ण विचारांती ठरविण्यात आलेला असतो; इतकेच नाही, परंतु या सहामाहीतील झोपसुध्दा दररोज तीन तासांच्या पूर्ण विचारांती घेतली जाऊन एका दगडाने दोन पक्षी मारल्याचे श्रेय पदरी येते. सहा महिने हा निश्चय जर कायम राहिला तर मग पुढील कार्यक्रमास सुरुवात करावी आणि जर निश्चय सहा महिन्यांच्या आतच ढासळून पडला, तर पुढे नाटक न लिहिण्याचा निश्चय करून टाकावा व हा दुसरा तरी कायम राहतो की नाही याबद्दल पुन्हा सहा महिने खात्री करून घ्यावी. सहा महिनेपर्यंत एकाच निश्चयाला चिकटून बसण्याइतके स्थैर्य मनाला नसले तर पुन्हा हीच विचारांची आवर्तने चालू ठेवावीत. वर्षाच्या एका सहामाहीत दक्षिणेच्या एका टोकाला पोहोचून पुन्हा हळूहळू उत्तरेकडे मोर्चा फिरविणार्या व दुसर्या सहामाहीत याच्या उलट प्रवास करणार्या सूर्यनारायणाप्रमाणे आपल्या मनाला असे विचारांच्या क्रान्तीमधून फिरवीत गेल्याने काही काळाने तरी (अर्थात् आपण मध्येच मेलो नाही तरच) आपला कोणता तरी एक विचार कायम होतो.

 

पुढे वाचा: नाटक कसे लिहावे