रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

प्रवेश पहिला

(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)

जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?

लीला : अशीच त्या दीनदयाळू परमेश्वराची इच्छा दिसते; स्वर्गात तरी तो तुम्हाला सुखात ठेवो!

जयंत : लीले, स्वर्गाबद्दलची माझी कल्पना क्षणोक्षणी ढासळत चालली आहे. स्वर्गाची प्रत्यक्ष साक्ष अजून कोणाला पटली आहे का? त्यापेक्षा परिचयाने प्रिय झालेली ही पृथ्वी किती तरी हवीशी वाटत आहे. खरोखरीच स्वर्ग असेल का? परमेश्वर असेल का? ही देखता डोळ्या आड होणारी प्रेमाची सृष्टी पुन्हा कल्पनातीत काळी तरी लाभेल का? एक ना दोन, हजारो तर्कांनी आत्मा व्याकुळ झाला आहे; स्वर्गात अप्सरा असतील पण अशी बाळपणाची सोबतीण, संस्कारजन्य प्रेमाची खाण, अशी लीला असेल काय? स्वाभाविक रीतीने मरण येताना मनुष्य बेशुद्ध होतो हे त्याचे केवढे भाग्य! पण अगदी जाणीवपणाने जगाचा निरोप घेताना संशयाच्या भोव-यात सापडून माझी काय स्थिती झाली ही!

सुशीला
: बाळा जयंता, धीर धर, ही केवळ ईश्वरश्रद्धेची कसोटी आहे. दृढभावाचा भुकेला भगवान कोणालाही अंतर देत नाही. त्याच्यावर दृढविश्वास मात्र ठेव.

जयंत : अहाहा! सुशीले, बोल बोल; तुझ्या अमृतवाणीचा या कानास शेवटचा लाभ होऊ दे. यापुढे मानवी शब्दांचा नाद त्यांना पारखा होणार. मृत्यूच्या राज्यातल्या अज्ञात प्रदेशात माझे समाधान कोणती सुशीला करणार? पाहा, लीले, अशीच प्रेमदृष्टीने पाहा. काळ, काही वेळ आपली गती थांबवून माझी भरत आलेली मृत्यूची घटका थोडी तरी लांबणीवर टाक. पण लीले, अशी रडू नकोस, माझे हृदय आता बायकांच्या हृदयापेक्षाही कोमल झाले आहे. तुझ्या डोळ्यांतले पाणी पाहून, हे पाहा, माझेही डोळे पाण्याने भरून येतात आणि त्यामुळे माझा पुढचा मार्ग मला स्पष्ट दिसत नाही. मृत्यूची वेळ दूर असली म्हणजे तात्काविक निर्भयतेमुळे स्वर्गाच्या गोष्टीवर सहज विश्वास बसतो; पण जसजशी, ती सगळ्या जगाच्या ज्ञानाच्या कसोटीची वेळ जवळ येते तसतसा विश्वास डळमळू लागतो. नको, लीले, रडू नको! ते अमोलिक अश्रू जपून ठेव. या अभाग्यासाठी असे उधळू नकोस.

लीला : रडू नको तर काय करू? आता या जगात मला कोणाचा हो आधार? माझे समाधान कोण हो करील? ही आपली लाडकी लीला दु:खाने गांजली म्हणजे यापुढे अशी कोणाच्या हो गळ्यात पडणार?
(त्याच्या गळ्याला मिठी मारते.)

जयंत : इहलोकीचा संबंध सुटल्यावर त्याची लाज तरी कशाला धरू आणि या अखेरच्या वेळी लीले, तुला दूर तरी कशाला लोटून देऊ? आता स्वर्गात हे सुख लाभेल काय? अप्सरांच्या डोळ्यांतून दिवय तेज लकाकत असेल पण या डोळ्यांच्या आरशांप्रमाणे त्यांच्यात बाळपणाची हजारो चित्रे दिसतील काय? नंदनवनातल्या वायूला या श्वासासारखी हुषारी आणिता येईल काय? या तनुलतेसारखे स्पर्शमुख स्वर्गातली ती कल्पकता कुठून देणार? आणि या एकेक अश्रूची संजीवनशक्ती तर अमृताच्या सागरात सुद्धा सापडणार नाही.

शिपाई : बाई दूर व्हा; अगदी काळाच्या दाढेत सापडलेल्या माणसाचा लोभ धरून काय कामाचा!

सुशीला
: बाबारे, अगदी प्रेताला वारा लागू नये म्हणून त्याच्यावर सुद्धा पांघरूण घालण्याची माया जेथे आवरत नाही तेथे जिवंता माणसाचा लोभ कसा सुटणार?

जयंत
: लौकर, फारच लौकर, हे सुख सोडावे लागत आहे. आजपर्यंत लोकलज्जेमुळे, पापाच्या ऐहिक कल्पनेमुळे, या सुखाचा कधीच अनुभव घेता आला नाही. आता या घाईच्या एका क्षणात साध्या आयुष्याचे सुख एकदम कसे अनुभवता येणार? दृढ अलिंगनाने या कायेचा चुराडा होईल; हपापलेल्या मुखाच्या श्वासाने हे ओठ करपून जातील आणि तीव्र प्रेमाच्या दृष्टीने हा देह छिन्नविछिन्न होईल!

लीला
: सावध व्हा, जयंत व्हा; मी आता तुमची बाळपणची अल्लड लीला नाही; पण समाजाने मानसिक संन्यास दिलेली, प्रेमाच्या शिवेपलीकडे लोटलेली, अशुभमूर्ती बालविधवा आहे!
(त्याच्यापासून दूर होऊ लागते.)

कमलाकर : (स्वगत) या हतभाग्याचे हे शेवटचे सुख पाहून सुद्धा अंगाची आग होते आहे. (उघड) तात्यासाहेब, हे कधीच आटोपणार नाही. आपणच पुढे व्हा. सरकारी माणसांची खोटी करणे गुन्हा होईल.

तात्यासाहेब : तेही खरेच! जयंता, बाळा चल; सावध हो.

जयंत : हो; खरेच; आता सावध झालेच पाहिजे. लीले, दूर हो! त्या दिवशी एक क्षणभर नसत्या कल्पनेला मनात थारा दिला त्याचे हे प्रायश्चित्त भोगतो आहे! आता मरता मरता कशाला हवा हा मोह! लीले, आजन्म तुझ्याशी केवळ बंधुप्रेमाने वागत आलो त्याची आठवण करून आताच्या माझ्या या पवित्र निर्दयतेची क्षमा कर; हा पहा मी तुला शुद्धत्वाच्या कठोरतेने अस्सा दूर लोटून या स्वर्गाच्या मार्गाला लागतो.
(फासावर चढून जातो.)

लीला : ताई, हा प्रसंग कसा गं पाहू? नुसत्या कल्पनेनेच मला घेरी येऊ लागत आहे; सारे शरीर लटपट कापत आहे.

सुशीला : त्यापेक्षा मन दगडासारखे घट्ट करून तू घरी जा. इथे उभे राहून तरी आपल्याच्याने काय होणार आहे? जा, तिकडे आपली गाडी आहे; गाडीवाल्याला सांग म्हणजे तो तुला घरी घेऊन जाईल. जा.
(लीला रडत जाते.)

जयंत
: जा, लीले, जा; आता कायमचे डोळे झाकताना अंगावर अजून शहारे येत आहेत. (डोळे अर्धवट मिटून पुन्हा उघडतो.) छे:, पृथ्वीमातेकडे, भोवतालच्या प्रियजनांकडे पाहण्याचा मोह पुन्हा अनावर होत आहे. आजन्मचरित्र एकदम डोळ्यांपुढे येऊन उभे राहते. बस्स, पुरे हा मोह. आता झाकलेले डोळे उघडल्यानंतर काय दृष्टीस पडेल त्याची कल्पना, परमेश्वरा, फक्त तुलाच!
(डोळे मिटून घेतो. घाईने विद्याधर प्रवेश करतो.)

विद्याधर
: (न्यायाधीशास) थांबा, थांबा, अन्यायाने निरपराध्याला ठार मारू नका. न्यायमूर्तींनी हे दोन दाखले पाहण्याची कृपा करावी. आरोपी जयंत याच्यावर कोणताच आरोप नाही, अशी या दाखल्यांवरून आपली खात्री होईल. मित्रा जयंता, खाली ये तू.
(दाखले देतो.)

कमलाकर
: (स्वगत) हा काय घोटाळा आहे आणखी? असे आड उभे राहून पहावे काय आहे ते! आणि प्रसंग पाहून पुढे कसे वागावयाचे हे ठरवावे.
(जातो.)

न्यायाधीश
: तात्यासाहेब, आपल्याला सांगावयाला मोठा आनंद वाटतो की, जयंत हे अगदी निर्दोष आहेत. मनोरमाबाई काल एका भलत्याच गावी दवाखान्यात वारल्या. (शिपायांस) अरे त्यांना उतरवा खाली!
(जयंत खाली उतरतो.)

तात्यासाहेब
: मग ते प्रेत कोणाचे?

विद्याधर
: ते द्रुमनचे! तिने आत्महत्या केली; आणि ती मात्र कमलाकरच्या अधमपणामुळे.

तात्यासाहेब : म्हणजे हा सर्वच प्रकार विलक्षण आहे!

विद्याधर
: (पत्र देऊन) हे पत्र पहा, द्रुमनने मरताना लिहून ठेवलेले पत्र! यात एकंदर प्रकार खुलासेवार लिहिला आहे. (न्यायाधीशास) मला वाटते आता खटला पु्न्हा चालवीपर्यंत आरोपीला जामिनावर सोडता येईलच!

न्यायाधीश
: ही गोष्ट सरन्यायाधीशांच्या अधिकारातली आहे. चला, जयंतांना घेऊन आपण कचेरीत जाऊ.

तात्यासाहेब : काय उरफाट्या काळजाचा राक्षस! कमलाकर! अरे, इतक्यात हा येथे होता आणि गेला कुठे?

विद्याधर : तो येथे कशाला राहतो?

तात्यासाहेब
: हे पत्र तुमच्या हाती कसे लागले?

विद्याधर
: कमलाकराच्याच एका रामोशाने चुकून मला दिले आणि त्यावरून मला सारा पत्ता लागत गेला. ती एकंदर हकिकत फार मोठी आहे. पण तात्यासाहेब, खटल्याची मजल येथपर्यंत आली कशी? तहकुबी मागण्यासाठी मी आपल्याला तार केली होती ना?

तात्यासाहेब
: मला तार केली होती? मला तर नाही मिळाली-

विद्याधर : ती सुद्धा त्या हरामखोराने नापत्ता केली असेल. चला, त्याचाही तपास केला पाहिजे. तात्यासाहेब, आपण न्यायाधीशसाहेबांबरोबर कचेरीकडे चला; मी त्या रामोशाला घेऊन येतो आणि साधल्यास तारेबद्दलही चौकशी करितो.

तात्यासाहेब
: ठीक आहे. चला.
(सर्व जातात. सुशीला जाऊ लागते.)

विद्याधर
: सुशीले, सुशीले, जरा थांब; आज मी तुला आणखी पुनर्विवाहाबद्दल विनंती करणार आहे!

सुशीला
: काय? या वेळी?

विद्याधर : हो, या वेळी आणि याच जागी! जी जागा जयंताची अमंगल मृत्यूभूमी म्हणून आपल्या स्मरणात राहणार होती तीच आता आपली विवाहभूमी म्हणून लक्षात रहावी अशी माझी इच्छा आहे.

सुशीला : या भलत्या विषयाची अशा गडबडीच्या वेळी-

विद्याधर : आता गडबडीची वेळ कसली? संकट नाहीसे झाल्यावरही ते फार भयंकर होते म्हणून भिण्यात काय अर्थ? भयंकर स्वप्नाचे जागेपणी भय बाळगणे हे खंबीर मनाचे लक्षण नाही. शिवाय कैदेतून मुक्त झालेल्या जयंताला आपण दोघे विवाहपाशात बद्ध झालेली दिसलो पाहिजे, असा माझा कृतनिश्चय झालेला आहे! सुशीले, अजून तुला माझी दया येत नाही काय? किती दिवस मला तू अशी अलोट दु:खात ठेवणार?

सुशीला : विद्याधर, मला असा आग्रह करू नका! तुमच्या विनवणीच्या प्रत्येक शब्दाने मी अधिक अधिक संकटात पडत आहे. त्या दिवशी तुम्ही त्या मांगाच्या हातून मला सोडविले त्या वेळी माझे मन बेभान झाले होते म्हणून रागाच्या आवेशात मी तुम्हाला भलतेच शब्द बोलून गेले; त्याची मला क्षमा करा! आणखी मोठ्या मनाने हा पुनर्विवाहाचा हेतू सोडून द्या!

विद्याधर : सुशीले, मी तुझ्या गुणाला योग्य नाही का? का एकदा तुझा उपमर्द केला म्हणून अजून तू माझा तिरस्कार करीत आहेस?

सुशीला : नाही, मी तुमचा तिरस्कार करीत नाही! माझ्या खोलीत तुम्ही पाऊल टाकिले तेवढ्या गोष्टीचा चांगला उलगडा करा, म्हणजे जी स्त्री तुमच्याशी लग्न करील तिला मी जन्माची धन्य समजेन!

विद्याधर : पण माझा तर तुझ्याबरोबर जन्म काढण्याचा संकल्प आहे.

सुशीला : तो संकल्प कधीच पुरा व्हावयाचा नाही! तुम्ही त्या मांगाच्या हातून मला सोडविले, जयंताला जवळजवळ तुम्हीच जीवनदान दिले. तुमचे आम्हा सर्वांवर अगणित उपकार आहेत. पण विद्याधर, तुमच्या पाया पडते. त्या उपकाराच्या मोबदल्यात या देहाची मागणी करू नका! त्याच्यावर माझ्या पतीची सत्ता आहे.

विद्याधर : सुशीले, किती दिवस त्या पतीची सत्ता चालणार? पतीच्या लहानशा मूर्तीच्या आठवणीवर सारा जन्म घालविणार काय?

सुशीला
: विद्याधर, मोठमोठ्या साध्वींची चरित्रे असेच करायला सांगत नाहीत का? गिरिधरलालाच्या बालमूर्तीच्या चिंतनात मिरादेवीने सारा जन्म घालविला ना?

विद्याधर : दंतकथेच्या राज्यातल्या या गोष्टी! सुशीले, गिरिधरलालाने भक्तीसाठी मिरादेवीच्या पदरात उडी टाकली तसा तुझा पती स्वर्गातून तुझ्यासाठी उडी टाकील का?

सुशीला : या हतभगिनीसाठी त्या कोमल बालमूर्तीला इतके श्रम? विद्याधर, माझा एवढा अधिकार नाही. त्यांच्या बाललीलांचे चिंतन करावयाचे, कल्पनेच्या वातावरणात वाढणा-या त्यांच्या बालमूर्तीचे प्रेमाने संगोपन करावयाचे एवढाच या त्यांच्या दासीचा अधिकार! त्या सुखाआड येऊ नका!

विद्याधर : पण अशा नुसत्या चिंतनात सारा जन्म गेल्यावर या तुझ्या दैवी रूपाचा, लोकोत्तर गुणांचा काय उपयोग? ईश्वरदत्त देणगीचा हा दुरुपयोग नाही का? हे सारे एकदा गेले की कायमचे गेले!

सुशीला
: एका जन्मानेच झाले का? विद्याधर, माझ्या यत्किंचित् रूपगुणांचे तर राहू द्या; पण जगात स्वैर पसरलेल्या सा-या सुंदरतेचा एवढ्यापुरताच का अवतार आहे? अतुल सामर्थ्य खर्च करून ईश्वराने एवढा सुंदर वस्तूंचा पसारा निर्माण केला तो काय क्षणिक वृत्तीने नाश पावण्यासाठी? पुष्पांचा सुवास एकदा वा-यावर वहात दिगंतराला जातो एवढीच त्याची कामगिरी? आकाशातल्या तारका नुसत्या चमकतात हात त्यांचा उपयोग? पवित्र प्रेमाची भाषणे, निर्दोष हास्याचे मंजुळ ध्वनी, आजाण बालकांचा उत्कट आनंद- आजपर्यंत जे जे क्षणिक, सुंदरतेचे सर्वस्व क्षणमात्र चमकून नाहीसे झाले ते काय कायमचे? या जगात त्यांचा जो तात्पुरता खेळ झाला तेवढ्यासाठीच ईश्वराने अनंत श्रमाने त्यांना निर्माण केले का? विद्याधर, आपले जग म्हणजे सुखदु:ख निर्माण करण्याचा ईश्वराचा प्रचंड कारखाना आहे. इथे जे जे चांगले निर्माण होते ते ते एका जागी साठवून परमेश्वर त्याचा स्वर्ग तयार करितो आणि जे जे वाईट त्याची रौरवाकडे रवानगी होते. या जगाच्या कारखान्यात खेळणारा आत्मा म्हणजे ईश्वराची ईच्छाशक्ती. तुम्हाला नाही का असे वाटत? आपण आपल्या पुण्याईने स्वर्गाला गेलो तर या सर्वांचा कायमचा उपभोग घेऊ. अनंत कालाच्या हिशेबात या क्षणमात्र आयुष्याची काय कथा!

विद्याधर : सुशीले, ही सारी तुझ्या कल्पनेची भरारी आहे. वस्तुस्थिती कदाचित् याहून फार निराळी असेल. हे वेड आहे, हे सोडून दे!

सुशीला
: असेल, हे वेड असेल; तरी मला ते फार सुखकारक आहे! ते काढून टाकण्याची माझी इच्छा नाही.

विद्याधर : शाबास, गुणिले, शाबास!

सुशीला : (चपापून) काय म्हणालात; काय नाव घेतले आता आपण?

विद्याधर : गुणिला! का बरे, इतका चपापलीस तू?

सुशीला : गुणिला हे नाव माझ्या पतींनी लग्नाच्या गडबडीत मला सांगितले; घाबरत घाबरत चटकन् माझ्या अगदी कानात सांगितले; त्यांनी मोठ्या आवडीने माझे हे गुजराथी नाव ठेविले. माझ्या पतीखेरीज हे नाल दुस-या कोणालाही ठाऊक नव्हते!

विद्याधर : गुणिले, तू म्हणतेस ते अगदी अक्षरश: खरे आहे!

सुशीला : म्हणजे? (त्याच्याकडे सारखी पहात उभी राहते.)

विद्याधर : वाढू दे, तुझी कल्पना स्वैर वाढू दे, आणि कल्पनेच्या राज्यातील तुझ्या पतीची बालमूर्ती पण वाढू दे! हं, आता नीट पाहा, त्या वाढलेल्या दृष्टी तरळू देऊ नकोस, हा पाहा हातावरचा डाग. लाजाहोमात मी आहुति टाकताना चोरट्या दृष्टीने तू सारखी त्याच्याकडे पहात होतीस ना?

सुशीला : मला नसती आशा लावून विद्याधर-

विद्याधर
: विद्याधराचा अवतार मघाशीच संपला; गुणिले, अजून या गुणाकराला ओळखले नाहीस?
(सुशीला त्याला अलिंगन देते.)

सुशीला : ओळखले, चांगले ओळखले. पण हे सारे खरे का हा भ्रम?

विद्याधर
: हे खरे आहे हे तुला पूर्वीच समजायला पाहिजे होते! मी जरी खरोखरी स्वर्गात असतो तरी सुद्धा भूलोकी या स्वर्गसुखासाठी उडी टाकिली असती! सुशीला, तुझ्या पातिव्रत्याच्या शक्तीची तुला कल्पना नाही. मी जर परपुरुष असतो तर, पतिव्रते, त्या दिवशी तुझ्या खोलीत पाऊल टाकताच जळून भस्म झालो असतो!

सुशीला : मग ती दुष्ट बातमी-

विद्याधर : अगदी खोटी! आपल्या लग्नानंतर मी जाताना, आमच्या लहानग्या जहागिरीच्या आशेने काकांनी मला समुद्रात ढकलून दिले खरे, पण बंदरावर होड्यांची गडबड असल्यामुळे एका नाखव्याच्या मदतीने मला आपला जीव वाचविता आला! पुढे ही सारी हकिकत मी गुप्तपणाने तेथल्या अधिकारीसाहेबांस कळविली. काकांचा स्वभाव दीर्घद्वेषी आणि पाताळयंत्री, त्यामुळे लहानपणी मला त्यांचे भय वाटले आणि दुसरे एखादे संकट टाळावे म्हणून नाव बदलून साहेबांच्या संमतीने उत्तर हिंदुस्थानात गेलो! साहेबांनी ही सारी गोष्ट गुप्त ठेवून आमच्या उत्पन्नातून मला विद्याभ्यासाचा खर्च मिळण्याची व्यवस्था करून बाकीचे उत्पन्न मी कायद्यात येईपर्यंत सरकारजमा ठेविले! पुढे काकाही वारले. माझा विद्याभ्यास संपला आणि मी इथे आलो!

सुशीला : आणि इतकेदिवस मला फसविले ना?

विद्याधर
: त्याची मात्र मला क्षमा कर! तुमच्या घरी चालणा-या फाजील सुधारणेचा तुझ्यावर क्ती परिणाम झाला आहे त्याची परीक्षा पाहिल्यावाचून- लाडके क्षमा कर- मला स्वीकार करवेना.

सुशीला
: पण आता तरी स्वीकार-

विद्याधर
: आता तूच माझा स्वीकार कर! चल, हे सारे वर्तमान तात्यासाहेबांना कळवू आणि जयंताच्या आणि लीलेच्या पुनर्विवाहाचा आनंद द्विगुणित करू. हो, पण आधी एवढे सांग की, तुझे माझ्याबद्दलचे मत एका क्षणात तुला बदलावयाला लावीन असे मी म्हटले होते ते खरे झाले ना?

सुशीला
: विद्याधरावरचा माझा राग काही कमी व्हावयाचा नाही.
(जातात.)