रविवार, फ़ेब्रुवारी 18, 2018
   
Text Size

सकाळचा अभ्यास

(दामू कोशांतून शब्द काढीत आहे; एका बाजूला दिनू भूगोल घोकीत आहे; प्रत्येकाजवळ पुस्तके व वह्या पडल्या आहेत;  जवळच कपडे पडले आहेत.)

दामू : (डिक्शनरीत पाहतो) एफ ए बी एल ई, एफ ए-

दिनू
: (मोठयाने) खानदेश जिल्ह्यातील तालुके- (तीनदा घोकतो.) धुळे, अमळनेर, एरंडोल, पाचोरे, धुळे, अमळनेर, एरंडोऽल-

दामू
: एफ एबी एल ई फेबल म्हणजे कल्पित गोष्ट.  (लिहू लागतो.)

दिनू : धु-ळे, अमळनेर-

दामू : दिन्या, हळू घोकणा रे! माझा शब्द चुकला की इकडे! हे बघ, फेबल म्हणजे कल्पित नेर झाले आहे. हळू घोक. (शब्द पाहू लागतो) बी ई ए यू-

दिनू : धुळे, अमळनेर, एरंडोल-

दामू : लागलास का पुन्हा ओरडायला? (वेडावून) धुळे, अमळनेर- मोठा आला आहे भूगोल करणारा! हळू घोक.

दिनू : अन् तू मोठा आला आहेस शब्द काढणारा! नाही घोकीत हळू जा! तुला वाटेल तर माजघरात जाऊन बैस. धुळे- अमळनेर-

दामू : ऐकत नाहीस?- नाही?- देऊ का भडकावून एक श्रीमुखात?

दिनू : का रे दादा त्रास देतोस? ए आई गं, हा दादा बघ मला उगीच मारतो आहे. धुळे- अमळनेर.

दामू : मारतो का रे? नाही गं आई. हाच. मोठमोठयाने ओरडतो आहे सारखा अन् अभ्यास करू देत नाही. आता ओरड तर खरा, की सांगतो कसे काय आहे ते! बी ई ए यू-
(डिक्शनरी चाळू लागतो.)

दिनू : ओरडेन, ओरडेन! तुला भिईन की काय? धुळे, अमळनेर-

दामू : दम खा! काढतोच तुझे 'धुळे-अमळनेर!'
(त्याला मारावयास धावून जातो; तो पळू लागतो.)

दिनू : आई, बघ गं हा दादा! धुळे अमळनेर- (घरात पळून जातो.)

दामू
: पळून गेलास, नाहीतर दाखविला असता स्वारीला चांगला इंगा! धुळे-अमळनेर करतो मोठा! येऊ दे आता बाहेर बच्चंजीला! म्हणजे काढतो सारा खानदेश जिल्हा. (जागेवर येऊन बसताना पेन्सिलीवर पाय पडतो.) अरे, अरे, अरे! गडबडीत पेन्सिल मोडून दोन तुकडे झाले तिचे; पण हे बरे झाले! एक तुकडा हरवला तर दुसरा आहेच! अन् आज पाटीवर शुध्दलेखन काढावयाचे आहे कुठे? हे एवढे शब्द काढले की झाले काम! अबब! केवढा लांबलचक शब्द हा! (डिक्शनरी उघडतो) बी ई ए यू-
(दिनू येतो.)

दिनू : दादा, तुला आईने-

दामू
: आलास का पुन्हा त्रास द्यायला! बी ई ए यू-

दिनू : तुला आईनं चहा घ्यायला बोलाविलं आहे, यायचं असेल तर ये नाही, तर नको येऊ.
(दिनू जातो.)

दामू : अरे चोरा! नको येऊ काय? म्हणजे एकटयालाच चहा प्यायला! मग काढीन मी शब्द!
(दामू जातो. जगू दुसरीकडून येतो.)

जगू : (धापा टाकीत) दादा-दादा, अरे ती बघ तिकडे- (पाहून) अरेच्या! दादा कुठे गेला? इथे तर दादाही नाही आणि दिनूही नाही! हा- हेच ते चित्रांचे पुस्तक! (रीडर उचलतो.) कशी छान चित्रं आहेत रंगीबेरंगी! बरं सापडलं आहे आयतंच! शेजारच्या रघूला दाखवितो आत नेऊन! अस्सं लपवून न्यावं; नाहीतर दादा पाहील एखादा! आलाच दिनू!
(जगू दामूचे रीडर घेऊन जातो. दिनू येतो.)

दिनू : धुळे, अमळनेर- पुढे काय बरं? किती तालुके आहेत हे? धुळे, अमळनेर- पण पुढचा कोणता तालुका?
(भूगोलात पाहतो. दामू येतो.)

पुढे वाचा: सकाळचा अभ्यास